Ad will apear here
Next
बालपणीची रम्य दिवाळी!
आपल्या ‘आठवणीतली दिवाळी’ किंवा वेगळ्या पद्धतीने साजरी करत असलेली दिवाळी याबद्दल लिहून पाठवण्याचे आवाहन ‘बाइट्स ऑफ इंडिया’ने वाचकांना केले होते. त्यातील निवडक लेख आजपासून प्रसिद्ध करत आहोत. पहिला लेख आहे कळवा येथील सीमा मराठे यांचा. डोंबिवलीत बालपणी साजऱ्या केलेल्या दिवाळीच्या आठवणी त्यांनी लिहिल्या आहेत. 
..........
आपल्या हिंदू संस्कृतीला बहुरंगी, बहुढंगी अशा विविध सणांचे एक छानसे वरदानच मिळाले आहे. अगदी चैत्र महिन्यातील गुढीपाडव्यापासून ते फाल्गुन महिन्यातील होळी, रंगपंचमीपर्यंत साजऱ्या केल्या जाणाऱ्या या सुंदर सणांचे महत्त्व खरोखरच अनन्यसाधारण आहे. प्रत्येक सणाचे आपण अगदी मनापासून, प्रसन्नतेने स्वागत करत असतो. आपली संस्कृती, परंपरा आणि चाली-रीतींना आपण जपत असतो. आज आपण २१व्या शतकात पाऊल टाकले असले, कितीही आधुनिकता आली असली, तरी प्रत्येक व्यक्तीने आपल्या संस्कृतीचे जतन करणे क्रमप्राप्त आहे, असे माझे प्रांजळ मत आहे. 

चला तर, आता मी तुम्हाला माझ्या आठवणीतल्या दिवाळीची मजा अनुभवयाला नेते. माझ्या बालपणीच्या दिवाळीचे काही किस्से सांगते. दिवाळी म्हणजे जणू एक चैतन्याची नवी पहाट.. अगदी बाळगोपाळांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांचा लाडका सण म्हणजे दिवाळी. या दिवसांत सर्वांच्या आनंदाला उधाण आलेले असते. 

अगदी असाच सळसळता उत्साह मला आणि माझ्या घरच्यांना दिवाळीच्या दिवसांत येत असे. मी पूर्वाश्रमीची सीमा विजय सरदेसाई. माझे माहेर डोंबिवलीचे.. आणि डोंबिवली म्हणजे संस्कृतीचे माहेरघर.. 

आम्ही घाग वाड्यात मी, माझी आई, माझे बाबा, माझा दादा आणि माझी आजी असे एकत्र राहायचो. दिवाळीची चाहूल लागताच आम्हा सर्वांच्या उत्साहाला पारावार नसायचा. आमच्या वाड्यासमोर एक छोटी चाळ होती. या चाळीतल्या माझ्या मित्र-मैत्रिणींसोबत आम्ही दोघं म्हणजे मी आणि माझा दादा दिवाळी साजरी करायचो. दिवाळी म्हटलं, की आम्हा लहान मुलांना सर्वप्रथम आठवायचा तो किल्ला. किल्ला करण्याच्या नवनवीन युक्त्या आमच्या डोक्यात घोळू लागायच्या. मग किल्ला झाला, की त्यावर मोहरी पेरायची. मग रोज किती उगवली ते पाहायचं अशी मजा आमची चालू असायची. 

मग आम्ही सर्व सख्या रांगोळी काढत असू. कोण जास्तीत जास्त ठिपक्यांची रांगोळी काढणार. याची चढाओढ लागलेली असायची. रांगोळी काढण्यात आणि त्यात रंग भरण्यात अगदी मी तासन् तास रमायची.

मी रांगोळी काढेपर्यंत इकडे माझ्या आईचा आणि आजीचा दिवाळीचा फराळ तयार असायचा. चकली, शेव, चिवडा, लाडू, नमकिन अशा विविध पदार्थांचा सर्वत्र घमघमाट सुटलेला असायचा. मग आमच्याकडे आकाशकंदील लावण्याचा मोठा कार्यक्रम असायचा. कारण घरातील सर्वांची वेगवेगळी मते; पण त्यातही खूप मजा यायची. माझे बाबा गॅलरीत आकाशकंदील लावायचे. 

मी आणि आई तुळशीजवळ, रांगोळीजवळ पणत्या लावायचो. घरोघरी असे आकाशकंदील आणि पणत्या लावण्यास सुरुवात झाली की वाटायचं की आता खरी दिवाळी सुरू झाली. 

वसुबारसेच्या दिवशी आई, आजी दोघी गाय-वासराची पूजा करायला जात असत. धनत्रयोदशीला बायकांची न्हाणी असायची. सुगंधित तेलाने आई माझ्या केसांना हळुवार मसाज करायची. तिचा तो मायेचा स्पर्श मला आजही आठवतोय. 

मग उगवायची ती नरकचतुर्दशीची पहाट. दादा पहिल्यांदा उठून सनईची टेप लावायचा. सनईचे मंजुळ स्वर ऐकता ऐकता एकीकडे आई आम्हाला सुवासिक उटणे लावायची. मग आम्ही सर्व शुचिर्भूत होऊन एकत्र फराळ करायला बसायचो. एकत्र फराळ करण्यात काही वेगळीच मजा यायची. एकेका पदार्थाचा सर्व जण मनसोक्त आस्वाद घेत असत. मग मी आणि दादा बाहेर फटाके फोडायला जात असू. 

मग दुसरा दिवस लक्ष्मीपूजन. संध्याकाळी बाबा अंघोळ करून लक्ष्मीदेवीची मनोभावे पूजा करत असत. तिसरा दिवस पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा. या दिवशी आई, बाबांना ओवाळायची. चौथा दिवस आम्हा बहीण-भावांचा लाडका दिवस. तो म्हणजे भाऊबीज.. या दिवशी मी माझ्या दादाला आणि माझ्या चुलत भावाला ओवाळून त्यांचे आशीर्वाद घ्यायची. बहीण-भावातील अतूट नाते दृढ व्हायचा हा दिवाळीतील खास दिवस. माझा दादा आणि माझा चुलत भाऊ मला ओवाळणी घालायचा. ही ओवाळणी मला खूप लाख मोलाची वाटायची. 

दिवाळीच्या दिवसांत आणखी एक गोष्ट मला खास नमूद करावीशी वाटते. मी माझ्या आजीसोबत एक दिवस गणपती मंदिरात काकड आरतीला जायचे. मंदिरातील देवाकडे पाहिल्यावर खूप प्रसन्न वाटायचे. आजीसोबत मी ही काकडाची गाणी म्हणायचे. त्यापैकी ‘काकडा झाला आता मुख प्रक्षाळा...’, ‘रुसू नको कृष्णा ये बैस पाठी.. घालिते तुजला रांगोळी मोठी..’ ही गाणी मला आजही आठवतात. 

अशा प्रकारे हा मंगलदायी, सुखदायक दिवाळीचा सण आम्ही खूप आनंदाने साजरा करत असू. दिवाळीच्या, बालपणीच्या रम्य आठवणी माझ्या सदैव स्मरणात राहतील. 

सौ. सीमा हृषीकेश मराठे
१०२, दिव्या अपार्टमेंट, दत्तवाडी, कळवा (पश्चिम)
ई-मेल : seemamarathe035@gmail.com

(आठवणीतली दिवाळी या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा,)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZSJCF
Similar Posts
आठवण पावसाळी दिवाळीची! यंदा राज्यात अनेक ठिकाणी दिवाळीच्या पहिल्या दोन दिवसांत प्रचंड पाऊस पडला. आता पाऊस ओसरला असला, तरी वातावरण पावसाळीच आहे. अशाच एका दिवाळीत अवचित आलेल्या पावसामुळे मुंबईतील चाळीत काय दाणादाण उडाली होती, याच्या आठवणी लिहिल्या आहेत अभय वैद्य यांनी..
नात्यांची वीण घट्ट करणारी दिवाळी सगळ्या सणांमध्ये अधिक आनंद देणारा आणि नात्यांची वीण घट्ट करणारा सण म्हणजे दीपोत्सव, अर्थात दिवाळी! आसुरी शक्तींवर विजय मिळवून समाजाला स्थैर्य आणि शांती प्रदान करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध केला आणि त्या विजयाचा आनंद अभ्यंगस्नान आणि गोडधोडाचं सेवन करून व्यक्त करण्यासाठी अश्विन वद्य चतुर्दशी
आठवणी दिवाळीचा फराळ बनवण्याच्या... दिवाळीच्या आधी घरी फराळाचे पदार्थ तयार करण्याचा साग्रसंगीत सोहळा आता चाळिशीच्या आसपास असलेल्या मंडळींनी त्यांच्या बालपणी अनुभवला आहे. त्याबद्दलचे स्मरणरंजन केले आहे मुंबईतील सीए केदार साखरदांडे यांनी.... आठवणीतली दिवाळी या लेखमालेत...
साहित्याची दिवाळी... कोणाची दिवाळी नवीन वस्त्र खरेदीची, कोणाची आभूषणे खरेदी करण्याची, कोणाची वास्तू घेण्याची, तर कोणाची जीवन साथीदाराच्या सहवासातील पहिली दिवाळी! कोणाची प्रिय व्यक्तीच्या ‘गमना’मुळे स्मृतींच्या प्रांगणात अश्रूभरल्या नेत्रांचीसुद्धा! प्रत्येकाच्या दृष्टीने दिवाळी वेगळी असते. अशीच ही माझ्या स्मृतीतील एक वेगळी दिवाळी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language